मी मराठवाड्यातील शेतकरी. मी नेहमी म्हणतो, ‘आजकाल शेती परवडत नाही.’ पण मी कधीच विचार केला नाही कि शेती का परवडत नाही? त्याला अनेक कारणे आहेत. आपण त्यातल्या एका विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे “जमिनीची भूक”.
मी जमिनीची भूक असं म्हटलो, त्याला कारण आहे. आपल्याला माहीतच नसतं कि जमिनीला किती आणि कशाची भूक लागलीये. आणि त्यामुळे आपली शेती खर्चिक बनली आहे. कारण पिकाच्या खर्चाच्या ४०% खर्च आपण रासायनिक खतावर आणि औषधावर करतो. हा खर्च जर आपण कमी करू शकलो, तर आपली शेती नक्कीच फायद्याची होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जसं माणूस आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे तपासतो आणि शरीरात जे घटक कमी आहेत, त्याचीच औषधे घेतो, अगदी तसच आपल्या मातीत काय कमी आहे ते तपासावं लागेल. म्हणजेच मातीचे परीक्षण करावे लागेल.
आता आपण बघू मातीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत. तर पिकास आवश्यक घटक १६ आहेत. त्यातले तीन घटक म्हणजे कार्बन, हायड्रोजन, आणि प्राणवायू. हे घटक आपल्याला पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश म्हणजे नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणजे याच्यावर आपल्याला खर्च करण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे, आपण त्याला मुख्य अन्नद्रव्ये म्हणतो, ते म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश. हे घटक मिळवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली रासायनिक खते विकत घेतो. जास्तीत जास्त शेतकरी, दुकानदार जे खत चांगले म्हणतो, तेच खरेदी करतात. तुमच्या मातीत काय कमी आहे किंवा काय जास्त आहे हे दुकानदाराला माहित असतं का? तर नाही. हे दुकानदाराला माहित नसतं. त्यामुळे काय होतं, तो खत देतो, आपण पेरणी करतो. जर आपल्या शेतात पालाशचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्याला स्फुरद गरजेचे आहे किंवा नत्र कमी आहे. आणि दुकांदाराने जर पालाशचे जास्त प्रमाण असलेले खत दिलेले असेल तर आपले नुकसान होते. त्यामुळे आपले उत्पादन घटते. तसेच जास्त असलेला घटक जास्त होतो व कमी असलेला घटक कमी पडतो. त्यावेळेस जर आपल्याकडे माती परीक्षण अहवाल असेल तर आपल्याला आवश्यक घटकानुसार खत खरेदी करता येईल. त्यामुळे आपले पैसे वाचणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला कोणते घटक कमी आहेत, त्यासाठी कमी खर्चिक गोष्टींचा अवलंब करता येईल. अशाप्रकारे आपली शेती फायद्याची होईल. म्हणूनच, वर आपण ‘माती परीक्षण म्हणजे खर्च कमी करणे’ असे म्हटले आहे.
~ रमाकांत शेळके
Leave a Reply