गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळाला ‘शेतकरी मित्र’ असे ही संबोधले जाते. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून ते वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.
गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.
गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.
गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने, पाऊस नियमित न झाल्यास, पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते. गांडूळ खत हे कचऱ्यापासून निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करायला हवे. अशाने उत्पादन खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो.
~ संदेश रणदिवे
Very informative blog?