वेळ अमावस्या !
यालाच दर्शवेळा अमावस्या असेही म्हणतात. प्रामुख्याने कर्नाटकातील काही तालुके, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके यांमध्ये साजरा केला जाणारा हा सन. मुळात कर्नाटक मध्ये ‘येळ’ म्हणजेच सात. आणि जूनपासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे “येळवस”. याचाच अपभ्रंश होऊन ‘वेळ अमावस्या’ असेल नाव या सणाला पडले असावे.
आपली शेतजमीन, शेतकर्याची माय, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
या सनाचं स्वरूप म्हणजे कडब्याची कोप तयार करून त्यावर शाल पांघरली जाते. त्याखालील भाग साफ करून सारवून घेतला जातो. त्यानंतर मातीचे 5 पांडव बनवले जातात, लक्ष्मी तयार केली जाते व त्यांची पूजा केली जाते. आरती झाल्यानंतर बनवलेले अंबिल आणि उंडे एकत्र करून रबि हंगामातील जे पीक आहे त्यावर शेतभर हे शिंपडलं जातं. आशाप्रकारे भूमातेला धन्यवाद दिला जातो, अशी प्रथा आहे. यानंतर सगळी मंडळी निसर्गरम्य वातावरणात गावकडील जेवणाचा आस्वाद घेते. या दिवशी शहरात सहसा शुकशुकाट दिसतो, सर्व दुकाने बंद असतात व कुटुंबातील सगळी मंडळी आपापल्या शेताकडे धाव घेते.
ज्यांच्याकडे शेत नाही त्यांनादेखील दुसर्यांच्या शेतात भोजनासाठी आमंत्रण दिलं जातं. अगदी लहानग्यांपासून ते वयस्कर मंडळीदेखील शेतात हजेरी लावतात. बाजरीच्या भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी, वरणफळं, मिक्स भाज्या, विविध चटण्या व या सणाची खास मेजवानी म्हणजे भज्जी आणि अंबिल या पदार्थांबरोबरच विविध रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो. हे सगळे पदार्थ आपल्या तब्येतीसाठी अगदी उपयुक्त असतात. दिवसभर रानात भटकणे व ढाळा, पेरु, ऊस, बोर, इत्यादि रानमेवा चाखण्याचा आनंदच काही वेगळा असतो!!!
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मनाला एक विरंगुळा म्हणून आणि आपल्या संस्कृतीची व प्रथांची आठवण ठेवण्यसाठी सर्वांनी हा सन आवर्जून साजरा करावा. याने आपल्याला सुदृढ शरीर तर लाभेलच पण त्याच बरोबर आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट होण्यास मदतदेखील होईल.
~ शितल स्वामी
निसर्गाच्या सहवासात जाऊन वनभोजनाचा आस्वाद हा एक या अमावस्येचा आगळावेगळा आनंद आणि अनुभव असतो.